हा लोकशाहीवरील हल्ला : कॉ. निगळे

0

जुन्नर । विचारांची लढाई विचारांनीच लढावी माणसे मारून विचार मरत नाहीत परंतु विचार कमकुवत असतात त्यामुळेच माणसांवर हल्ले केले जातात. हा हल्ला केवळ गौरी लंकेश यांच्यावरील नसून लोकशाहीवरील हल्ला असल्याचे मत जुन्नर तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे सचिव कॉ. विश्वनाथ निगळे यांनी मांडले.

जुन्नर तहसील कार्यालयावर एसएफआय व किसान सभेच्या वतीने पत्रकार गौरी लंकेश्‍वर यांचा खुनाच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. दिनांक 5 सप्टेंबरला कन्नड ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा बंगळूर येथे त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून काही अज्ञात माथेफिरूंनी खून केला. याआधी नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांचाही याच पद्धतीने खून केला गेला. त्यामुळे यामागे मोठे षडयंत्र असून या खुनाचा कसून तपास करावा यासाठी जुन्नरमध्ये एसएफआय व किसान सभा जुन्नर तालुका समितीच्या वतीने तहसील कार्यालय येथे जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.

गौरी लंकेश या लंकेश वृत्तपत्राच्या संपादिका होत्या. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्रीवाद, स्त्री स्वतंत्र, सरकारची चुकीची धोरणे, गोरगरीब जनतेचे प्रश्‍न यांसह हिंदू धर्मातील चुकीच्या संकल्पनावर विज्ञानवादी दृष्टिकोनातून सडकून टीका केली होती. म्हणून काही समाजविघातक प्रवृत्तींनी त्यांच्यावर हा भ्याड हल्ला केल्याचा संशय बळावत आहे. या वेळी एसएफआयचे पुणे जिल्हा सचिव विलास साबळे, अध्यक्ष कॉ. राजेंद्र शेळके, जुन्नर तालुक्याचे कॉ. मंगेश बोर्‍हाडे, किसान सभेचे जुन्नर तालुका किसान सभेचे सचिव कॉ. लक्ष्मण जोशी आदींची भाषणे झाली. त्यानंतर तहसिलदार जुन्नर यांना निवेदन देऊन या घटनेचा निषाध करण्यात आला.