लातूरच्या मोर्चात एक दलित भगिनीचे मराठा समाजाविषयी अतिशय विखारी वक्तव्य असणारी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटावी असे वातावरण असताना सकल मराठा समाजाने हा विषय अतिशय संयमाने हाताळल्याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. काही मराठा भगिनींनी या भाषणाला अतिशय संयमी उत्तरही देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कुठेही आततायी कृत्य घडल्याचे उदाहरण नाही अर्थात यामुळे अनेक उपटसुंभ नाराज झाले असतील, एवढी गरळ ओकली तरी मराठे शांत कसे? या चिंतेने त्यांच्या पोटात कालवाकालव सुरू असेल हे नाकारता येत नाही.
अवघ्या महाराष्ट्राला मोर्चा कशाला म्हणतात याची शिकवण देऊन काही आदर्श निर्माण करणार्या मराठा क्रांती मूकमोर्चानंतर राज्यात प्रतिमोर्चांना सुरुवात झाली आहे. बहुजन क्रांती मोर्चा असे नाव धारण करून काढले जाणारे हे मोर्चे कुणाच्या विरोधात नसल्याचे सांगितले जात असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे आपल्या समोर आले आहे. लातूरच्या मोर्चात एक दलित भगिनीचे मराठा समाजाविषयी अतिशय विखारी वक्तव्य असणारी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटावी असे वातावरण असताना सकल मराठा समाजाने हा विषय अतिशय संयमाने हाताळला त्याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. काही मराठा भगिनींनी या भाषणाला अतिशय संयमी उत्तरही देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कुठेही आततायी कृत्य घडल्याचे उदाहरण नाही अर्थात यामुळे अनेक उपटसुंभ नाराज झाले असतील, एवढी गरळ ओकली तरी मराठे शांत कसे? या चिंतेने त्यांच्या पोटात कालवाकालव सुरू असेल हे नाकारता येत नाही. बहुजन क्रांती मोर्चा उद्या सगळा महाराष्ट्र काबीज करो त्याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, कोणत्याही कारणामुळे का असेना एक समूह एकत्रित येतोय आणि आपल्या समस्यांचे चिंतन, मनन करून त्यावरील उत्तरे शोधतोय ही नक्कीच चांगली घटना म्हटली पाहिजे. परंतु, चित्र जे समोरून दिसते तेवढे पारदर्शी नाही याची चिंता वाटते. या सगळ्यामागे असणारा मेंदू राजकीय आहे हे आता उघड झाले आहे. बामसेफचे अनेक तुकडे मोजता-मोजता थकलेले वामन मेश्राम आता बहुजन क्रांती मोर्चाचे तारणहार बनले आहेत. नाव बहुजन असले तरी या मोर्चामध्ये 80 टक्के बौद्ध बांधव सामील होतात हे आता लपून राहिले नाही आणि बौद्ध समूहात आपली गेलेली पत सावरण्याचा मेश्राम यांचा केविलवाणी धडपडसुद्धा महाराष्ट्र बघतो आहे. यानिमित्ताने पुन्हा लोंकाच्या भावनेला हात घालणारी भाषणे करावी आणि गावोगाव माणूस माणसाविरोधात उभा करायचा या घाणेरड्या राजकारणाला नव्याने सुरुवात होण्याचा धोका यातून स्पष्टपणे दिसतोय हे चिंताजनक आहे.तीनचार दशकांपूर्वी गावगाड्यात दलित सवर्ण तेढ अतिशय प्रखर होती, त्याचे दीर्घकाळ परिणाम समाजाने भोगले आहेत. दोन्ही समाज कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्यात आपल्या डोळ्यापुढे बरबाद झाल्याचे सार्यांनी अनुभवले आहे, यातून समतेची चाके उलटी फिरवली गेली, समाज 20 वर्षे मागे आला. जे अतोनात नुकसान व्हायचे ते दोघांचेही झाले, ज्यांनी आपल्याला आपसात झुंजवले त्यांना पुन्हा अशा झुंजी बघण्याची हुक्की आली आहे. हे कोणत्याही प्रश्नावर आपल्या झुंजी लावणारे सगळ्या जाती धर्मात आहेत, आपल्यावर त्यांची पकड आजवर सैल झाली होती त्याचे कारण अक्षर शत्रू असणारा दोन्हीकडचा बलाढ्य समाज गेल्या काही दशकांत पुस्तकांशी नटे सांगायला लागला, फुले, शाहू, आंबेडकर डोक्यात साठवून घायला लागला, आता एवढ्या वर्षाच्या ज्ञानावर अशी कोणती जळमटे चढली की आपण पुन्हा भूतकाळात जायला अधीर झालो आहोत? भूतकाळ प्रेरणा कमी आणि वेदना अधिक देणारा असतो, त्यात सामाजिक संघर्ष कटू असतात त्यातून जो नेमकेपणा उचलतो तो अशा फंदात पडत नाही पण ज्याला हे मागचे संदर्भ माहीत नसतात तो नक्कीच सामाजिक खेटे घ्यायला सुरुवात करतो, ज्याला हे सगळे अवगत आहे तरीही झुंजी लावण्याचा आसुरी आनंद घ्यायचा आहे त्याला वामन मेश्राम म्हणतात हे कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. ज्याने बाबासाहेब वाचले, समजून घेतले तो कधीच कोणत्या व्यक्तीचा, समूहाचा द्वेष करूच शकत नाही, तो कुणाबाबतही पूर्वग्रहदूषित असू शकत नाही. ज्या मराठ्यांनी बाबासाहेब समजून घेतले त्याने आपल्या संघर्षाचे टोक बदलले, आपला नेमका शत्रू कोण आहे याचा शोध घेण्यात त्याला बाबासाहेब वाटाड्याच्या रूपात भेटले म्हणूनच असंख्य मराठ्यांनी आपल्या तोफेची दिशा बदलून टाकली, त्यांच्या निशाण्यावर बौद्ध किंवा अनुसूचित जाती राहिल्या नाहीत. अनुभवाच्या शहाणपणामुळे डोळ्यावरची झापडे दूर व्हायला मदत झाली. शंभर वर्षांपूर्वी कुणाच्या पणजोबाने कुणाच्या आजोबावर अत्याचार केले म्हणून आता त्यातली तीव्रता शोधण्याची ज्यांना घाई झाली आहे अशांनी बहुजन मोर्चाची ढाल पुढे करून महाराष्ट्रात विखाराची पेरणी सुरू केली आहे. ज्यांना समाजाचा वापर करून राजकीय पोळी भाजायची असेल त्यांनी तसे नक्कीच करावे पण असे करताना आपण येणार्या पिढ्यांसाठी काय पेरून ठेवतोय याचा विचार नक्कीच करायला हवा. सध्याच्या विशी – तिशीतल्या पिढीला कांगावा, बदमाशी किंवा राजकारण समजून सांगण्याची गरज नाही, ती उपजतच शार्प आहे. तिच्या पसंतीचे विषयसुद्धा वेगळे आहेत चिंता आहे फक्त खूप शिकलेल्या पिढीची कारण अशी प्रौढ पिढीच अतिशय तकलादू कारणावर टोकाची भूमिका घेताना दिसते. त्यांचा संयम कधीच संपला आहे, आपल्या तारुण्यात जे उपद्रव जमले नाहीत ते कुणीतरी करताना ज्यांना बघायचे आहेत त्यांनी हे विद्वेषी मोर्चे उचलून घेतले आहेत आणि त्यात द्वेषाचा बार भरण्याचे उद्योगही तेच करीत आहेत अशावेळी दोन्ही बाजूच्या सुजाण लोकांनी एकत्र येऊन समाजमन कलुषित करण्याचे हे रिकामटेकडे उद्योग बंद केले पाहिजेत.