हिंगणघाटच्या बहिणीला वाचवू शकलो नाही ही लाजीरवाणी घटना: अजित पवार

0

मुंबई: हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा आज मृत्यूशी झुंज संपला. आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त केला आहे. “हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे अशा शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी पीडितेला श्रद्धांजली असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे”.