हिंगणघाट जळीत प्रकरण; आरोपीवर दोषारोपपत्र दाखल

0

वर्धा : हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीविरोधात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हिंगणघाट इथे कॉलेजला जात असलेल्या प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. नागपूरच्या रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला अटक केली होती. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करत पुरावे गोळा करण्यात आले. शुक्रवारी घटनेपासून २६ व्या दिवशी ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच्या निर्भयानं ७ दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिली. मात्र, 10 फेब्रुवारीला पहाटे उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात ३०२ या कलमाची वाढ केली आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम ३०७, ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.