वर्धा: जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत मुलीवर उपचार सुरु होते. मात्र मृत्यूशी झुंज देण्यात तरुणी अपयशी ठरली. आज सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. तरुणीच्या मृत्यूने समाज मन सुन्न झाले आहे. गुन्हेगाराला शिक्षा होऊन न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पीडितेने गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली.
या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र त्यात यश आले नाही.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत होता. आज तरुणीच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.