वर्धा: गेल्या आठवड्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या हिंगणघाट येथील तरुणीची आज अखेर प्राणज्योती मालवली. पीडितेच्या मूळ गावी साश्रू नयनाने भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या गावातील ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी अश्रू भरल्या डोळ्याने निरोप दिला. हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती.
या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. तसेच पिडीतेच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येईल,असे वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी लेखी लिहून दिले आहे.
गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. ७ फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला होता.