आरोपी डंपर चालकाची जामिनावर सुटका : घटनेची सखोल चौकशीची मागणी
यावल : राखाड वाहणार्या भरधाव डंपरच्या धडकेत क्रुझरमधील 12 जण ठार सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील मोर धरण वसाहतीजवळ सोमवारी पहाटे एक वाजेच्या वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघाताला कारणीभूत ठरणार्या डंपरला अज्ञातांनी आग लावल्याची घटना मंगळवारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा डंपर नेमका पेटवला कुणी? या मागील कारण काय ? याबाबत आता उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे.
भीषण अपघातात 12 जणांचा गेला होता बळी
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोलचे रहिवासी प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांची कन्या मंजुश्रीचा 30 रोजी चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील यांचे पूत्र प्रतीकशी थाटातविवाह समारंभ झाल्यानंतर रविवार, 2 रोजी चोपडा येथे वराकडील मंडळींनी स्वागत समारंभ (रीसेप्शन) ठेवल्याने तीन खाजगी वाहनांद्वारे चौधरी परीवारातील सदस्यांसह नातेवाईक चोपडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर विविध वाहनांद्वारे वर्हाडी गावाकडे येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ राखाड घेवून जाणारा भरधाव डंपर (एम.एच.40 डब्ल्यू 7558) ने कु्रझर (एम.एच.19 सी.व्ही.1772) ला जोरदार धडक दिल्याने क्रुझरमधील 12 जणांचा मृत्यू झाला होता तसेच सहा जण गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघातस्थळी रात्रभर वाहने तशीच पडून असताना अज्ञातांना सोमवारी मध्यरात्रीनंतर डंपरला पेटवून दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
कालबाह्य डंपर : आरोपी चालकाला जामीन
सूत्रांच्या माहितीनुसार, अपघाताला कारणीभूत ठरणार्या डंपरची फिटनेसची मुदत 2019 मध्येच संपली होती मात्र असे असतानाही त्यातून राखेची वाहतूक केली जात होती. डंपरला पेटवण्यामागे नेमके हित कुणाचे? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. दरम्यान, अटकेतील डंपर चालक मुकुंदा भंगाळे (डांभूर्णी) यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.