यावल। तालुक्यातील हिंगोणा शिवारात 24 जुलै रोजी रात्री 8 ते 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान शेतात झोपलेल्या बारेला कुटूंबियांवर अज्ञात इसमाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गर्भवती महिलेचा जागीच मृत्यु झाला असून तिच्या पतीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अज्ञात इसमांनी केला कुटुंबावर हल्ला
हिंगोणा शेती शिवारात गट नं. 1631 चे शेतमालक जियाउलहक इबादत अली यांच्या शेतात बारेला कुटूंब वास्तव्यास होते.. 24 जुलै रोजी रात्री 8 ते 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान दोघे पती पत्नी व त्यांचा लहान मुलगा अंगणात विहिरी जवळ झोपले असतांना अज्ञात इसमांनी बारेला कुटूंबियावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मंगला दुर्गेश बारेला (वय 22) यांच्या डाव्या कानाजवळ गळ्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर पती दुर्गेश चंद्रसिंग बारेला (वय 32) यांच्या मानेवर मारेकर्यांनी जबर घाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्रथम यावल ग्रामीण रूग्णालय येथे प्रथमोपचार करून नंतर जळगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मयत.मंगला दुर्गेश बारेला यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला असता मयत महिला गर्भवती असल्यामुळे त्यांचा मृतदेह जळगाव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. दुर्गेश बारेला यांना त्यांची पत्नी हयात नसल्याची कल्पना देखील नाही.कारण ते बेशुध्द आहेत. तर या बारेला कुटूंबियाला असलेल्या एक वर्षाच्या निष्पाप मुलाचे मातृछत्र गेले असून वडिल दवाखान्यात गंभीर स्थितीत असल्याची जाणीव देखील त्याला नाही. सुदैवाने जखमी दुर्गेश बारेला यांना असलेल्या पाच भावंडांपैकी काही जळगाव सामान्य रूग्णालयात त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. घटनेची माहिती मिळताच तपासकामी जळगाव येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फेैजपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आधार निकुंभे, पोलिस उपनिरिक्षक रामलाल साठे, पोलिस उपनिरिक्षक जिजाबराव पाटील, हेमंत सांगळे, विनोद पाटील, मालवीय हे करित आहे. हा खून व प्राणघातक हल्ला कोणी व का केला? हे अद्याप गुलदस्त्यात असून याचा तपास पोलिस घेत आहेत. घटनेबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात शेंड्या चंद्रसिंग बारेला (रा.हिंगोणा, ता.यावल शिवार) यांनी फिर्यादी दिल्यावरून अज्ञात मारेकर्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.