चोपडा। तालुक्यातील हिंगोणे येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र नारायण पाटील वय 49 यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी 25 रोजी घडली. चोपडा येथील गुरुदत्त कॉलनीतील राहत्या घरातील छताच्या कडीला वायर बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्यांना उपजिल्हा रुगणालायत उपचारासाठी दाखल केले असता डॉ.नरेंद्र पाटील यांनी मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला डॉ.नरेंद्र पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
राजेंद्र पाटील यांचे जवळ मौजे हिंगोणे येथे एक एकर शेती आहे, ती कसण्यासाठी त्यांनी विकास सोसायटीकडून आठ वर्षांपूर्वी बारा हजार रुपये कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे आतापर्यंत त्या कर्जाची रक्कम परतफेड केली नाही म्हणून ती रक्कम दंड व्याजासह वाढतच होती. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तसेच शेतकर्यांना तात्काळ 10 हजार रुपये मिळावे अशी ही घोषणा केली मात्र अद्याप ते मिळाले नाहीत. त्यातच त्यांचे आजारपणही वाढत गेले. पावसाला सुरुवात झाली तरी पेरणीसाठी पैसा कसा उभारायचा या विवंचनेतच त्यांनी गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.