फैजपूर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दाम्पत्यासह मुलगा व पुतणी गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवार, 17 रोजी यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील स्मशानभूमीजवळ घडला. या प्रकरणी शनिवार, 23 एप्रिल रोजी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात वाहनाने दिली जबर धडक
दिलीप अमृत झांबरे (42, रा.चिनावल, ता.रावेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रविवार, 17 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता ते पत्नी लतिका झांबरे, मुलगा राज झांबरे आणि पुतणी रीधी झांबरे असे चौघे दुचाकी (एम.एच.19 बी.एस.1588) ने हिंगोणा येथून चिनवल येथे घरी येत असताना हिंगोणा गावातील स्मशानभूमीजव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दिलीप झांबरे हे गंभीर जखमी झाले तर इतर तिघे जण किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शनिवार, 23 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता योगिता मोहन झांबरे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार देविदास सुरदास करीत आहे.