हिंगोली जिल्ह्यात तब्बल 482 बालके तीव्र कुपोषित

0

हिंगोली । जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करून त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार 482 तीव्र कुपोषित बालके आणि 1 हजार 271 मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र कुपोषित बालके आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात आले. बालकांना चौरस आहार दिला जाईल, असे जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी (महिला व बाल) सांगितले.

वजनावरून बालकांची श्रेणी ठरणार
अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे दरमहा वजन घेऊन त्यानुसार बालकांची श्रेणी ठरविण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या एकूण 99 हजार 975 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 83 हजार 108 बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी 71 हजार 569 बालके सर्वसाधारण श्रेणी (86.12 टक्के) 9 हजार 241 बालके मध्यम कमी वजनांची (11.12 टक्के) 2 हजार 298 तीव्र कमी वजनांची बालके (2.76 टक्के) आहेत. जिल्ह्याच्या मासिक प्रगती अहवालावरून सद्य:स्थितीत असलेले आकडेवारी आहे. ग्राम बाल विकास केंद्रामध्ये बालकांना चौरस आहार तसेच औषधोपचार यासह इतर आवश्यक सुविधा असणार आहेत. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी बाल कल्याणकडून प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील बालकांची तपासणी आणि सकस आहाराबाबत पालकांना समूपदेशन केले जात आहे.