हिंजवडीतील तरुणीची ऑनलाईन फसवणूक

0

हिंजवडी : तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे. त्या कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट तुमच्या बँक खात्यावर टाकतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने हिंजवडी येथील एका 24 वर्षीय तरुणीला ऑनलाईन साडेसोळा हजार रुपयांना गंडा घातला आहे. स्निग्धा श्रीवास्तव (वय 24, रा. हिंजवडी. मूळ रा. सिंगरोली, मध्यप्रदेश) असे फसवणूक झालेल्या तरुणीने नाव आहे. याप्रकरणी स्निग्धा श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 हजार 510 रुपये केले ट्रान्सफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्निग्धा यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून मी बँकेतून बोलत आहे. तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे. तुमचे रिवॉर्ड पॉईंट मी तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करतो, असे सांगितले. त्यासाठी त्याने श्रीवास्तव यांच्या बँक खात्याची सर्व माहिती, ओटीपी नंबर मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पेटीएमद्वारे त्याच्या खात्यावर 16 हजार 510 रुपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र, संबंधित रकमेचा कोणताच व्यवहार आपल्या खात्यावर झाला नसल्याचे श्रीवास्तव यांच्या लक्षात आले. मात्र, त्यानंतर मोबाईलधारकाशी त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांचे आवाहन
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणी ऑनलाईन फसवणुकीला जास्त बळी पडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही आपल्या बँक खात्याची गुप्त माहिती, खाते क्रमांक देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.