हिंजवडीत आज मानवी साखळी

0

हिंजवडी : आयटी पार्क म्हणून जगभरात नावारुपास आलेल्या हिंजवडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांनी पावले उचलली आहेत. हिंजवडी म्हटले की, डोळ्यासमोर येते ती वाहतूक कोंडी. गुगलच्या नकाशावर या भागात कायमच वाहतूक कोंडी असल्याचे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी येथील नागरिक आणि आयटीयन्स यांनी उद्योगमंत्री, स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. वाहतूक कोंडी सोडविण्याचा एक भाग म्हणून, स्थानिक नागरिक आणि आयटीयन्स हे एकत्रितपणे शुक्रवारी मानवी साखळी तयार करणार आहेत.

हा तर शहरीकरणाचा फटका
शहरीकरण झाले की, त्या भागाचा विकास होतो, असे म्हटले जाते. पूर्वी टुमदार असलेल्या हिंजवडी गावाचा विकास झाला. मोठ्या इमारती झाल्या, हिंजवडी झकपक झाली. जमिनींना भाव आला. परंतु, वाढत्या शहरीकरणामुळे या भागाला वाहतूक कोंडीने ग्रासले. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. पण ते सगळे निरुपयोगी ठरले. त्यामुळेच शुक्रवारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना अमित तलाठी म्हणाले की, येथील वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक व नोकरदारांना रोज तोंड द्यावे लागत आहे. मात्र, यावर तोडगा निघत नाही. यासाठी आम्ही पुढाकार घ्यायचे ठरवले. हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे व शाम हुलावळे यांच्याशीही याबाबत चर्चा केली. त्यांनीही या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास सांगितला. त्यानुसार उद्योगमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सविस्तर निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना ई-मेलवर सगळ्या समस्या पाठवल्या. त्यावर त्यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

हिंजवडीची सध्याची परिस्थिती
हिंजवडी येथे 225 पेक्षा अधिक कंपन्या आहेत. हिंजवडीमध्ये दररोज कामानिमित्त प्रवास करणार्‍यांची अंदाजे संख्या साडेसहा लाख आहे. सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत हिंजवडीच्या रस्त्यावरून सुमारे एक लाख चारचाकी वाहने जातात, तर दीड लाख दुचाकी जातात. हिंजवडी असोसिएशनच्या 130 मेट्रोझिप बस, अंदाजे 400 सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षा. त्याचप्रमाणे पीएमपीएमएलच्या 40 मार्गांवरून 13 बस दर 45 मिनिटांच्या अंतराने धावत असतात. या व्यतिरिक्त अन्य वाहनेदेखील या भागातून जात असतात.

हिंजवडीकरांच्या समस्या
वाहनांच्या वर्दळीमुळे हिंजवडीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ, वाहतूक कोंडीमुळे अर्धा तासाच्या अंतराला तीन तास लागतात, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीमुळे गावातील लग्न समारंभ बाहेर करण्याची वेळ, वाहतूक कोंडीमुळे अनेक जण हिंजवडीत येणे टाळतात, घरातील ज्येष्ठ आणि लहान मुलांना बाहेर पडताना कायम घरातील मोठ्या व्यक्तीची सोबत घ्यावी लागते, प्रदूषणामुळे श्वसनविकारात वाढ, अशा समस्यांना हिंजवडीकरांना तोंड द्यावे लागत आहे.