गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई
हिंजवडी : हिंजवडी आयटी हबमधील एका गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला पावणे आठ लाखांचा गुटखा सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा गुटखा पोलिसांनी छापा मारून जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 13) रात्री बाराच्या सुमारास ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर युनूस तांबोळी (वय 45, रा. पवारनगर, थेरगाव ) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोडावूनवर मारला छापा…
गुन्हे शाखेच्या पोलीस पथकातील कर्मचारी शहरामध्ये रात्रीची गस्त घालत असताना कर्मचारी प्रसाद जांगिलवाड यांना एक दुचाकीस्वार संशयितरित्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या पिशव्या तपासल्या असता त्यामध्ये गुटख्याचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने हिरामण साखरे यांच्या गोडावूनमध्ये आणखी गुटखा साठवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी गोडावूनवर छापा मारून विविध कंपन्यांचा एकूण 7 लाख 71 हजार 132 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी प्रसाद जांगिलवाड, आर. जी. महाडिक, आर. बी भिसे, पी. सी. शेलार, पी. व्ही. गुट्टे यांच्या पथकाने केली.