हिंजवडीत लोखंडी सांगाडा कोसळून मजूर ठार

0

फेज 3 मधील दुर्घटना; 30 ते 35 मजूर जखमी

हिंजवडी : बांधकाम साईटवर काम करणार्‍या मजुरांच्या निवार्‍यासाठी उभारलेला पत्राशेडचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य 30 ते 35 मजूर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडीतील फेज 3 मध्ये घडली. जखमी मजुरांवर हिंजवडी व वाकड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजब लाल (वय 35) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात लेबर कॅम्प बांधकाम करणारा ठेकेदार, सेफ्टी मॅनेजर, कॅम्प सुपरवायझर यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेवणाच्या कारणावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल अ‍ॅण्ड डब्ल्यू या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणार्‍या बांधकाम मजुरांना राहण्यासाठी कंपनीच्या वतीने हिंजवडीतील फेज 3 मध्ये सहा महिन्यांपूर्वी पत्राशेड बांधून देण्यात आले होते. या पत्राशेडमध्ये पाच ब्लॉक होते. ज्यात 80 खोल्या होत्या. एका खोलीत 10 ते 15 असे 80 खोल्यांमध्ये सुमारे एक हजार मजूर तेथे राहत होते. रविवारी रात्री मजुरांच्या मेसमध्ये जेवणाच्या कारणावरून वादावादी झाली. मजुरांमध्ये भांडणे सुरू असल्याने पत्राशेडच्या पहिल्या व तळमजल्यावरील इतर मजूर भांडण पाहण्यासाठी बाहेर आले. पहिल्या मजल्यावर मजूर जास्त असल्याने त्यांच्या वजनात पत्राशेडचा लोखंडी सांगाडा अचानक खाली कोसळला. त्यात खाली असलेले 30 ते 40 मजूर जखमी झाले.

अजबच्या डोक्यास जबर दुखापत
या घटनेत अजब लाल याच्या डोक्यास जबर दुखापत झाली. त्याला त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. इतर जखमी मजुरांवर हिंजवडी व वाकड येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून, निकृष्ट दर्जाचे सामान वापरल्याबद्दल लेबर कॅम्प बांधकाम करणारा ठेकेदार, सेफ्टी मॅनेजर, कॅम्प सुपरवायझर यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातत्याने घडताहेत घटना
पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. शहराच्या चारही बाजूला मोठमोठ्या बांधकाम साईट सुरू आहेत. प्रत्येक बांधकाम साईटवर परराज्यातून मजूर कामाला येतात. मोठ्या बांधकाम साईटचे काम साधारणपणे दोन ते तीन वर्ष सुरू राहते. त्यामुळे अनेक मजूर त्या परिसरातच राहतात. बांधकाम ठेकेदार पत्र्याचे शेड उभारून मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करतात. मजूर राहत असलेल्या ठिकाणी अनेक गुन्हेगारी कृत्यदेखील होत आहेत. शिवाय ठेकेदार मंडळी मजुरांच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करत नसल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. ठेकेदार सुरक्षिततेची साधने पुरवत नाहीत. त्यामुळेही अनेकदा दुर्घटना घडते.