हिंजवडी येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

0

पिंपरी-चिंचवड : चुकीच्या दिशेने जाणार्‍या कॅब चालकाने गाडी तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या पायावर घालून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. ही घटना हिंजवडी येथील शिवाजी चौकात घडली. या प्रकरणी विद्याधर मधुकर अवताडे (वय 35, रा. डोणगाव, सोलापूर) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी वाहतूक पोलीस मल्हारी वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. ते शिवाजी चौकात वाहतूक नियमन करत होते. यावेळी प्रवेश बंद मार्गावरून अवताडे हा कॅब घेऊन जात असल्यामुळे त्याला रोखले. यावर अवताडे याने गाडी थांबविली नाहीच, उलट वाघमारे यांच्या डाव्या पायावर घातली. नंतर गाडी बाजूला घेत वाघमारे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. अवताडे याला अटक करून सरकारी कर्मचार्‍याला मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असा गुन्हा दाखल केला आहे.