हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

0

मुंबई : पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सार्वजनिक-खासगी सहभाग तत्वातून ‘करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा) या तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) अंमलबजावणी करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मेट्रो मार्गाची लांबी 23.3 किलोमीटर राहणार असून, या प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प अवघ्या 48 महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असतील, असेही बापट म्हणाले.

2022 पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास!
मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत ना. बापट म्हणाले, की मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला मंजुरी मिळाली असून, 23.50 किलोमीटरचा हा मार्ग होणार आहे. यासाठी 8, 313 कोटी रुपये खर्च लागणार असून, 1,137 कोटी केंद्राकडून अपेक्षित आहेत तर राज्य सरकारकडून 1,812 कोटी अपेक्षित आहेत. तर उरलेले पैसे खाजगी गुंतवणूकदारांकडून घेतले जाणार आहेत. पीपीपी तत्वावर प्रकल्प उभारणार असल्याचे बापट यांनी सांगितले. 2022 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, यामुळे औद्योगिक क्षेत्रात अडीच लाखाच्या वर लोकांची सोय होणार आहे. यासाठी दिल्ली मेट्रोकडून प्लॅन तयार केला असून, यामध्ये 23 स्थानके होणार आहेत. 48 महिने प्रकल्पाचा कालावधी असून, ही मेट्रो शिवाजीनगर, औंध, बाणेर, हायवे, बालेवाडी वाकडमार्गे हिंजवडीला जाणार आहे. पहिल्यांदा दर पाच मिनिटांनी एक गाडी सुटेल तर 5 वर्षानंतर पावणेतीन मिनिटाला गाडी सुटणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.

डेपोकरिता 25 हेक्टर जमीन लागणार
या प्रकल्पासाठी खासगी 25 हेक्टर जमीन डेपोकरिता लागणार आहे. तर एमआयडीसीकडून 18 ते 20 हेक्टर जमीन लागणार असल्याची माहिती बापट यांनी दिली. महाळुंगे गावात टीपी स्कीम वरदान ठरणार असून, शेतकर्‍यांना त्यांचा पूर्ण एरिया डेव्हलप करून मिळणार आहे. 50 टक्के जागा देणार्‍यांना 100 टक्के एफएसआय मिळणार असल्याचे बापट म्हणाले. यासाठी शेतकर्‍यांना एकही पैसा न देता रेसिडेंशियल झोन करून मिळणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. यासाठी कुणाचाही विरोध नसल्याचेदेखील ते म्हणाले. पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील इतर मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येत असल्याने या सर्व प्रकल्पांमध्ये एकवाक्यता राखण्यासाठी सदर प्रकल्पाची अंमलबजावणी महामेट्रोचा वेळोवेळी सल्ला घेऊन करावयाची आहे, असेही बापट म्हणाले.

पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर!
बहुचर्चित मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगतिपथावर असून, पहिल्या टप्प्यातील 31 किलोमीटर मार्गाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळणार आहे. त्यातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असतील. सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पीएमआरडीए यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तो डिसेंबर 2016 मध्ये पीएमआडीएच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी 48 महिन्यांचा असून, तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी 764 प्रवासी प्रवास करु शकतील.