गिरीश बापट : पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. प्रतिदिन सुमारे 1 लाख 92 हजार प्रवाशांना वातानुकूलित, आरामदायक प्रवास उपलब्ध होणार असून प्रवासाठी लागणार्या वेळेमध्ये बचत होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पीएमआरडीएच्या मेट्रोचे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (दि.18) बालेवाडी स्टेडियम येथे दुपारी 4.15 वाजता होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बापट यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार विजय काळे, प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते. मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, हरदीप सिंग पुरी आदी उपस्थित राहणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
खासगी भागीदारीतील पहिला प्रकल्प
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा-सिमेन्स कंपनीला देण्यात आले आहे. देशातील पहिला मेट्रोचा खासगी भागीदारीतील प्रकल्प आहे. मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा व रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 20 टक्के निधी मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला तिसर्या मेट्रोचा मार्ग मिळणार असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो प्रकल्पाची वैशिष्टे
हिंजवडी ते शिवाजीनगर – 23 किलोमीटर मार्ग
मेट्रो मार्गावर – 23 स्थानके
संपूर्ण मेट्रो इलेव्हेटेड असणार आहे.
एकूण प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी
1 हजार 811 कोटीचा खर्च भूसंपादनासाठी
केंद्र शासनाकडून 20 टक्के निधी
राज्य शासनाकडून 20 टक्केनिधी जमिनीच्या स्वरुपात