हिंजेवाडी नव्हे तर ‘हिंजवडी’ उल्लेख करावा

0
हिंजवडी ग्रामस्थांची पीएमआरडीएकडे मागणी
हिंजवडी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयातून होत असलेल्या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा करीत आहेत. चुकीच्या अपुऱ्या माहितीमुळे या चुका होत आहेत. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयातून होणार्‍या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा न करता ‘हिंजवडी’ असा करावा. त्याबाबतचे आदेश काढण्याची मागणी हिंजवडी ग्रामस्थांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामस्थांनी स्पष्टीकरण देत बदल करण्यास सांगितले
हिंजवडी ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटी हबमुळे हिंजवडी गावाचा नावलौकिक संपूर्ण जगभर झाला आहे. नोकरीनिमित्त देशाच्या विविध भागातून आयटीयन्स हिंजवडी परिसरात वास्तव्य करीत आहेत. मात्र चुकीच्या, अपुर्‍या माहितीमुळे आणि कदाचित जाणीवपूर्वक गावाचा नामोल्लेख हिंजवडी ऐवजी हिंजेवाडी असा केला जात आहे. यामुळे नावाचा वाद सर्व स्तरांवर पोहोचला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून ‘हिंजवडी’ हेच नाव योग्य असल्याचे सांगितले आहे.
गावाच्या नावामध्ये परस्पर बदल करणे बेकायदा आहे. याला वेळीच आला घातला पाहिजे. अन्यथा गावाच्या मूळ नावाचे अस्तित्व धोक्यात येईल. बांधकाम व्यावसायिक त्यांच्या वेगवेगळ्या साईटच्या जाहीरातींमधून आणि काही वृत्तपत्रातून देखील हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा केला जात होता. इंग्रजीमध्ये लिहिताना स्पेलींग तसे होत असते. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी याबाबत स्पष्टीकरण देत यात बदल करण्यास सांगितले. त्यानंतर या होणार्‍या चुका कमी झाल्या आहेत.