मुंबई : हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहेत? आणीबाणीच्या काळात देशातील लेखक, पत्रकार एकत्र आले होते. मग आता ही सर्व मंडळी कुठे गेली? असा असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या व्हिजन पुढच्या दशकाचे या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेही ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकार फक्त घोषणाबाजी करत असून, जाहिरातबाजीवर पैशांची उधळपट्टी होत आहे.
लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. हिंदीची सक्ती का केली जात आहे? हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. हिंदी भाषा वाईट नाही. कोणतीही भाषा ही नेहमी चांगलीच असते. पण त्याची सक्ती करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. राज्यातील सध्याचे सरकारदेखील आधीच्या सरकारसारखे फक्त थापा मारत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.