मुंबई-इंग्रजी शिक्षणाचे खूळ डोक्यात घेऊन कशा पद्धतीने मुलांवर ओझे लादले जाते हे अभिनेते इरफान खान याने ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात दाखविले होते. त्याचाच दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कर्करोगावर परदेशात उपचार घेणारा अभिनेता इरफान खान नुकताच मुंबईत परतला. संपूर्ण बॉलिवूड त्याच्या पुन्हा पदार्पणाची वाट पाहत आहे. ‘हिंदी मीडियम’ या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण तो लवकरच सुरू करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरसुद्धा असेल. दिग्दर्शक आणि निर्माते तिग्मांशु धूलिया यांनी या सिनेमाची अधिकृत घोषणा केली असून, सध्या सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे.
इरफानला न्यूरोएंडोक्राइन या प्रकारच्या कर्करोगाने ग्रासले होते. लंडनमध्ये त्याच्यावर वर्षभर उपचार सुरू होते. तो भारतात कधी परतणार यावर त्याच्या चाहत्यांचे लक्ष होते. देशात पाऊल टाकल्यानंतर त्याने चाहत्यांशी काहीच संवाद साधला नव्हता. चेहऱ्यावर रुमाल बांधलेला त्याचा फोटो तेव्हा व्हायरल झाला होता. पण, यावेळी त्यानं चाहत्यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आजवर दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यानं चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ‘कुठेतरी जगण्याच्या शोधात असताना आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची किंमत फार मोठी असते हे कळलं. तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमामुळे मी आज इथवर पोहोचू शकलो आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार’, असे त्याने ट्विट करून सांगितले आहे.