भारिपचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी
मुबंई : कोरेगाव भीमा मध्ये दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या पाश्वर्भूमीवर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा सायंकाळी साडेचार वाजता भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र त्याचवेळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेबद्दल शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसार खटले दाखल करावेत तसेच सरकारने या दोघांना अटक करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली. पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनही केले.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनवर ज्या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल करा. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात याकूब मेमनचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. पण ही दंगल भडकविण्यासाठी त्याने सर्व मदत केली होती. भिडे आणि एकबोटे यांनीही तसाच प्रकार केला असून या दोघांचे कृत्य दहशतवादाप्रमाणे आहे. त्यामुळे या दोघांवर त्यापद्धतीनेच गुन्हे दाखल करण्यात यावे,’ अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
ते म्हणाले की, काही हिंदू संघटना गोंधळ निर्माण करत आहेत आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविरोधात आपण केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देवून बंद यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. भिडे आणि एकबोटे यांच्यावर ३०२ कलमानुसार खटले दाखल करा. भिडे आणि एकबोटे यांना सरकारने अटक करावी अशी मागणी करत काही हिंदू संघटना अराजकता माजवत असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला.