हिंदुत्वाचा सामाजिक विकास अजेंडा

0

भारतीय जनता पार्टीच्या उत्तरप्रदेशातील महाविजयानंतर सत्तेची सुत्रे कोणाच्या हाती येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर उत्तरप्रदेशमधील खासदार योगी आदित्यनाथ यांची निवड मुख्यमंत्रीपदी करण्यात आली. तर उपमुख्यमंत्रीपदी केशव मौर्य आणि दिनेश सिन्हा यांची. या तिघांची निवड करुन भाजपला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र उत्तरप्रदेशातील सामाजिक समीकरणे, अवघ्या दोन वर्षांवर आलेली लोकसभा निवडणूक लक्षात घेतली तर तर प्रश्नाचे उत्तर काहीसे लक्षात येते.

योगी आदित्यनाथ म्हणजे एक आक्रमक झंझावाती नेतृत्व. कोणालाही न जुमानता हिंदुत्वासाठी लढणारा लढवय्या म्हणून त्यांना ओळखले जाते. विषय लव्ह जिहादचा असो, घरवापसीचा असो वा हिंदूराष्ट्राचा. स्वत:ची प्रतिमा सर्वसमावेशक करण्यासाठी इतर हिंदुत्ववादी नेते काहीशी सौम्य भूमिका घेताना सर्रास दिसतात. विशेषत: सार्वजनिक व्यासपीठांवर तर वेगळीच भूमिका मांडली जाते. अपवाद आहे तो योगी आदित्यनाथांचा. आपल्या हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने आक्रमकतेने वागणारा हा नेता त्यामुळेच उत्तरप्रदेशच्या हिंदू तरुणांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे.

योगी म्हणजे धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रात आहे, याचा अर्थ शिकलेले नाहीत असा नाही. ते अध्यात्माकडे वळले ते अवघ्या 26 व्या वर्षी. गोरखपूरच्या गोरक्षनाथ पीठात. हे पीठ म्हणजे नाथ संप्रदायाशी संबंधित. जात-पात न पाहता कार्य करणारे. महंतही ब्राह्मण नसतात. गोरक्षनाथ पीठाच्या महंत अवैद्यनाथांच्या लक्षात या तरुण विद्यार्थ्याचा तडफदारपणा आला. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने एम.एस.सी. करत असलेले ठाकूर अजयसिंह हे योगी आदित्यनाथ झाले. त्यांच्या संन्यास दीक्षा संमारंभास विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल उपस्थित होते. तेथेच कोठेतरी या तरुण योगी आदित्यनाथांच्या राजकारणाची बीजे रोवली गेली असावित. दोनच वर्षांनी ते खासदार झाले. सर्वात तरुण खासदार. त्यांना निवडताना त्यांची आक्रमक प्रतिमा, उत्तरप्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागांमधील त्यांची लोकप्रियता (जिचा पुरेपूर वापर प्रचारात स्टार प्रचारक म्हणून केला गेला!) तसेच दबावाखाली न येता आपला अजेंडा रेटून नेण्याची कार्यशैली यामुळे केला गेला असावा. उत्तरप्रदेशातील प्रभावी ठाकूर समाजालाही जोडून ठेवण्यात ते प्रभावी भूमिका बजावतीलच, त्याच बरोबर दिल्लीतील सत्तासमीकरणांमध्ये बदल करताना राजनाथ सिंहांसारख्या नेत्याच्या बाबतीत काही वेगळा निर्णय झाला तरी ते उपयोगी ठरु शकतील.

एक उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे खरेतर मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्यांपैकी एक. निवडणुकीदरम्यान प्रदेश भाजपची सुत्रे यशस्वीरीत्य सांभाळणारे केशव मौर्य हे संघाशी संबंधितच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच संघर्षातून पुढे आलेले. त्यांनी बालपणी पेपर विकणे, चहा विकणे अशी कामे केली. पुढेही कष्टाळूपणा कायम राहिला. हिंदुत्वाच्या विचारांना समाजातील सर्वच थरांमध्ये पोहचवण्यासाठी ते सतत सक्रीय राहिले. या निवडणुकीत सपाच्या आणि बसपाच्या जाती मतपेढ्यांना फोडण्याचे काम करण्यात त्यांचाही मोठा वाटा मानला जातो. त्यातही इतर मागासवर्गीयांपैकी कोइरी समाजाचे असल्याने त्यांना त्या वर्गातील जातींमध्ये भाजपाविषयी आपुलकी निर्माण करता आली. तसेच बसपाकडे असलेल्या मोर्य मतदारांनाही भाजपाकडे आणता आले.

समर्पित भावनेने दिलेले कार्य लक्ष्यसिद्धीपर्यंत पोहचवण्यासाठी शांतपणे सतत, अविरत प्रयत्नरत राहण्याची त्यांची कार्यशैली त्यांना भाजपा श्रेष्ठींच्या मनात स्थान मिळवून देण्यात उपयोगी ठरली असावी. आता नंबर एक होता आले नसले तरी नंबर दोन म्हणून त्यांना प्रभावीरीत्या काम करत राहावे लागणार आहे.
दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे तसे भाजपचा परंपरागत मतदार असणाऱ्या पांढरपेशा वर्गातील. ब्राह्मण समाजातील या नेत्याची परंपरा स्वच्छ. सोपवलेले काम 100% करुनच दाखवणाऱ्याची. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले गेले तेव्हा ते चर्चेत आले. भाजपाचे 10 कोटी सदस्य अभियानाचे ते सूत्रधार. ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे त्यांच्याकडून 2019साठी खास अपेक्षा असावी. त्यामुळेच सत्तेचे बळ दिले गेले असावे.

एकूणच विचार केला तर भाजप श्रेष्ठींनी 2017मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री ठरवताना डोळ्यासमोर 2019च्या लोकसभा निवडणुका ठेवल्या असाव्यात असे वाटते. तिघांची निवड करुन ब्राह्मण, ठाकूर, ओबीसी हे प्रभावी समाज जोडताना सामजिक समीकरण साधलेच आहे. पण त्याचबरोबर संघपरिवाराच्या मूळ हिंदूत्व अजेण्याच्या अंमलबजावणीची सोय केली आहे. उगाचच सत्तेत बसल्यावर मुळ विचारांपासून फारकत घेऊन अतिउदारमतवादी धोरणाच्या नादात अजेंडाच विसरला जाऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.

भाजपचा यावेळचा उत्तरप्रदेश महाविजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास मॉडेलला असलेला कौल आहेच पण त्याचबरोबर अमित शहांची सामाजिक समीकरणे साधत, कडवट हिंदूत्वाचे कार्ड खेळण्याच्या भूमिकेचाही आहेच. त्यामुळे हे तीन नवे शिलेदार आता तोच अजेंडा मग त्याला सत्तेतील हिंदुत्वाचा विकास अजेंडा पुढे नेतील. त्यासाठीच त्यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली असेल, ही शक्यता आहे. विकास करावाच लागणार आहे. जाती-धर्म कोणतेही असो विकास आता प्रत्येकालाच पाहिजे आहे. त्यामुळे विकासाच्या मार्गावर उत्तरप्रदेशाला पुढे नेत जनतेला वचन दिल्याप्रमाणे उत्तम प्रदेश बनवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करावी लागेल. त्याचवेळी उत्तरप्रदेशच्या राजकारणाच मूळ जातीपोत लक्षात घेऊन त्या-त्या समाजघटकालाही आपल्यासोबत जोडून ठेवावे लागणार आहे. हे सारे करतानाच संघ परिवाराचा हिंदुत्वाचा मूळ आत्माही विसरुन चालणार नाही. तिघांची निवड करताना योगी आदित्यनाथांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यामागे खरा उद्देश तोच असावा. एकूणच उत्तरप्रदेशच्या नव्या शिलेदारांना सामाजिक समीकरणांसह हिंदुत्वाच्या विकास अजेंड्याला राबवण्याच्या एक वेगळ्याच मार्गावरुन पुढे जावे लागणार आहे. तेही मिशन 2019 लक्षात घेऊन फक्त दोन वर्षातच!