पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारने शंभर कोटी एवढी भरीव मदत केल्यानंतर हिंदुस्थान अँटिबायोटिकने (एचए) यापूर्वी आलेला तोटा भरून काढून पुन्हा एकदा प्रगतिपथावर राहिले पाहिजे आणि देशाच्या औषधनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये पुन्हा उभारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले. केंद्रीय अर्थमंत्री जेटली व केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी भेट घेऊन एचए कंपनीचे पुनर्वसन आणि कामगारांचा थकीत पगार त्वरित मिळण्यासाठी चर्चा केली. या संदर्भामध्ये येत्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडून 100 कोटी वितरित होणार आहेत. कामगारांचा थकीत पगार आणि कंपनी चालू करण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश एचए कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले आहेत.
कंपनीने कारभारात सुधारणा करावी
मागील कारभारानुसार कंपनीत पुन्हा पुन्हा तोटा निर्माण होणे हे देशाच्या विकासाला बाधा आणणारे आहे. देशाच्या विकासाचा पैसा अशा तोट्यात जाणार्या कंपनीवर पुन्हा खर्च करणे म्हणजे शोषित, पीडित, वंचितांच्या मार्गावर बाधा आणल्यासारखे होणार आहे. यासाठी संबंधित कंपनीने आपल्या कारभारामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि कामगारांनी मेहनत केली पाहिजे, अशा भावना जेटली यांनी व्यक्त केल्या.
कामगारवर्गात आनंद
हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीतील कामगारांचे वेतन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. मात्र, तरीही कामगार स्वेच्छेने आपले काम करत आहेत. केंद्र सरकारने कंपनीच्या पुनर्वसनासाठी 100 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यासोबतच कंपनीच्या मालकीची काही जमीन विकण्यासदेखील परवानगी दिल्याने कंपनीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे.