हिंदुस्थान अँटीबायोटीक्सच्या शिष्टमंडळाची अरुण जेटलींसोबत चर्चा

0
पिंपरी चिंचवड : पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या शिष्टमंडळातील सदस्य सुनील पाटसकर, अरूण बोर्‍हाडे, अरूण पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी असून अनेक समस्यांनी कंपनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा पगार ही गेल्या 19 महिन्यापासून प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालु ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे.
कंपनीसंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय…
कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकत नाही. कंपनीच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. खा. बारणे यांच्या पाठपुराव्याने कंपनीला केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळाले असून त्यातून कामगारांचे थकीत वेतन देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले. परंतु एच. ए. कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अर्थ मंत्रालयच या बाबत कंपनीला योग्य मदत करू शकते या संदर्भात शिष्टमंडळाने जेटली यांची भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्यची विनंती केली. सरकार हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे जेटली यांनी सांगितल्याचे खा. श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.