वर्धा:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेच्या प्रचारासाठी वर्ध्यात प्रचारसभा घेत आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. ज्यांनी हिंदू दहशतवादावरून भाजपवर टीका केली, तेच आता निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत. ज्या ठिकाणी हिंदुंची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढण्यास नकार देत आहेत आहे. देशातील कोट्यवधी हिंदूंना ‘हिंदू दहशतवादी’ संबोधण्याचे पाप काँग्रेसने केले असून त्यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. जनता त्यांना निश्चितच शिक्षा देईल, अशी घणाघाती टीका मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथून महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावरून काँग्रेसचं षडयंत्र उघड झालं आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक बिथरले आहेत. त्यामुळेच जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला मोदींनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.
हजारो वर्षाच्या इतिहासात हिंदू दहशतवाद हा शब्दच नाही. तरीही हिंदूंवर हिंदू दहशतवादाचा काळीमा फासण्यात आला. खरे तर आजवर हिंदू दहशतवादाची एखादी तरी घटना घडलीय काय? इंग्रज इतिहासकारांनीही हिंदू दहशतवादाची कुठेच नोंद केलेली नाही. मग ५ हजार वर्षाचा इतिहास असलेल्या आपल्या संस्कृतीवर हा कलंक कोणी लावला? अशा काँग्रेसला तुम्ही माफ करू शकता का?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच हिंदू दहशतवादाचा शब्दप्रयोग केला होता, असे मोदी म्हणाले.