पिंपरी-चिंचवड : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी लक्षवेधी शोभायात्रा निघाल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांचीदेखील दिवसभर रेलचेल होती. ढोल-ताशा, टाळ-मृदुंग आदींचा होणारा गजर, भगवे फेटे परिधान करून हातात भगवे झेंडे घेतलेले महिला व पुरूष, चौका-चौकात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या अशा प्रसन्न व चैतन्यमय वातावरणात शोभायात्रा निघाल्या होत्या. या शोभायात्रांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनीदेखील आपल्या घरांमध्ये आकर्षक अशा गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले. प्रगतीचा संकल्प करत अनेकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
सकाळपासून अपूर्व उत्साह
गुढीपाडव्याचा सण म्हणजे हिंदू संस्कृतीत नव्या वर्षाची सुरुवात मानली जाते. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्तदेखील मानला जातो. त्यामुळे या दिवशी दारात गुढी उभारून आगामी वर्षासाठी एकमेकांना सदिच्छा प्रदान केल्या जातात, मनाशी नवे संकल्प केले जातात. मंगळवारी गुढीपाडव्याचा सण असल्याने सकाळपासूनच शहरात नागरिकांमध्ये अपूर्व उत्साह दिसून आला. सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी श्री. शालिवाहन शके 1939 हमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होऊन नूतन वर्षाला प्रारंभ झाला. या शुभ मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून, तिचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आप्तेष्ट, मित्रमंडळीला नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शोभायात्रांनी वेधले शहरवासीयांचे लक्ष
गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येतात. यंदाही शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. निगडी, यमुनानगर या भागातील शोभायात्रा विशेष लक्षवेधी होत्या. शाळकरी विद्यार्थी, महिला व पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक आदींनी शोभायात्रांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला होता. काही ठिकाणी तर ग्रंथदिंडीही काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला व पुरुषांनी भगवे फेटे परिधान केले होते. काहींनी आपल्या हातात भगवे झेंडे घेतले होते. शोभायात्रेच्या मार्गावर पुष्पवृष्टी केली जात होती. शोभायात्रेत सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही अपूर्व उत्साह दिसून येत होता.
बाजारपेठेत चैतन्य
गुढीपाडव्यानिमित्त घराघरात गोडधोड, पुरणपोळीचे जेवण तयार करण्यात आले होते. हिंदू संस्कृतीत गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असल्याने मंगळवारी अनेक नोकरदारांनी कामावरून सुटी घेत, कुटुंबीयांसमवेत हा सण साजरा करणे पसंत केले. दुसरीकडे, गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते. नोटाबंदीनंतर सुस्तावलेल्या बाजारपेठेत गुढीपाडव्यामुळे चैतन्य संचारले होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहने, घर-प्लॉट खरेदीसाठी अनेकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला.