मुंबई: केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी कायदा केला आहे. याला कॉंग्रेससह भाजपविरोधी पक्षाने विरोध केला आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. मात्र राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी घेतली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असे होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.