रामनाथी, गोवा येथे 4 जून ते 7 जून या कालावधीत सातवे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वीरीत्या पार पडले. देशाच्या 18 राज्यांतून तसेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशातून 175 संघटनांचे 375 हून अधिक प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. देशविदेशात कार्यरत असणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीकरणाचा, हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मबंधुत्वाची भावना जागृत करणारा, साधनेच्या स्तरावर करायला शिकवणारा अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा उपक्रम म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मार्गावरील मैलाचा दगड म्हणावा लागेल. याविषयी ऊहापोह करणारा लेख.
हिंदुत्ववाद्यांचा समान कृती कार्यक्रम
काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘हिंदू समाज एकत्र होऊ शकत नाही’, अशी भावना समाजात प्रचलित होती. हिंदुत्वनिष्ठ संघटना गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतरण, इतिहासाचे विकृतीकरण, गंगा नदी प्रदूषण, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन आदींच्या विरोधात आपापल्या क्षेत्रात कार्यरत होत्या. असे असले तरी, देशभरात कार्यरत असणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन, कार्याचे सुसूत्रीकरण, विचारांचे आदान-प्रदान, हिंदुत्वाला आवश्यक असणारा साधनेचा पाया याची उणीव होती. ‘संघे शक्ती कलौयुगे’ या उक्तीनुसार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटनांचे संघटन साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आणि त्याला यशही मिळाले, मिळत आहे.
यंदाच्या वर्षी झालेल्या अधिवेशनामध्ये गत अधिवेशनांप्रमाणेच हिंदुत्वावरील आघात, उपाययोजना, हिंदुत्वाचे कार्य करताना येणार्या समस्या, कार्य करताना घ्यायची काळजी यांविषयी केवळ तात्त्विक स्तरावर चर्चा न करता येत्या वर्षभरात राबवायच्या उपक्रमांचा कृतीआराखडा निश्चित केला गेला. समाजात हिंदू राष्ट्राविषयी जागृती होण्याच्या उद्देशाने ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत हिंदू राष्ट्र जागृती सभा, हिंदू राष्ट्र जागृती परिसंवाद, हिंदू राष्ट्र संपर्क अभियान, वर्ष 2019 च्या प्रयाग कुंभमेळ्यात हिंदू राष्ट्र जागृती आणि संतसंघटन आदी उपक्रम राबवण्याचे ठरले. या जोडीला भ्रष्टाचार आणि अन्य सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. 2 आणि 3 जून या दिवशी झालेल्या अधिवक्ता अधिवेशनामध्ये न्यायव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच शासन-प्रशासन यांच्याकडून घेतल्या जाणार्या हिंदूविरोधी निर्णयांविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचे अधिवक्त्यांनी निश्चित केले. ‘भारतासह नेपाळ हे हिंदू राष्ट्र घोषित व्हावे, देशात गोवंश हत्याबंदी, धर्मांतरबंदी आणि अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी यांसंदर्भात तत्काळ निर्णय घेतला जावा, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवर होणार्या अत्याचारांची भारत सरकार तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी आणि तेथील अल्पसंख्य हिंदूंना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीर खोर्यात ‘पनून कश्मीर’ या स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात यावी, रोहिंग्यांची हकालपट्टी केली जावी’ आदी प्रस्तावही या अधिवेशनामध्ये एकमुखाने संमत करण्यात आले.
‘हिंदूंवर अन्याय आणि अन्य पंथीयांचे लांगूलचालन’ अशी भारतातील धर्मनिरपेक्षतेची अवस्था आहे. जगातील सर्व देशांमध्ये बहुसंख्याकांच्या धर्माला अधिकृत घटनादत्त संरक्षण आहे. मात्र, भारतात सनातन हिंदू धर्माला ते नाही. जगात हिंदूंचे असे एकही राष्ट्र नाही. त्यामुळे आणीबाणीच्या काळात संविधानात घुसडला गेलेला आणि आजपर्यंत व्याख्याही न केला गेलेला ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द वगळून त्या जागी ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द घालावा, अशी आग्रही मागणी अधिवेशनामध्ये करण्यात आली.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमिका
वर्ष 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चन पंथीयांच्या धर्मगुरूंनी त्या दृष्टीने आताच ‘संविधान संकटात आल्याने प्रार्थना करावी’, अशा प्रार्थना करण्याचे फतवे काढले आहेत. आतापर्यंतच्या निवडणूकांमध्ये हिंदूंच्या भावनांचा उपयोग करून घेतला जातो. मात्र, आश्वासनपूर्ती केली जात नाही, असा दुर्दैवी अनुभव हिंदूंनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदूंचा एक सकारात्मक दबावगट निर्माण होण्याच्या दृष्टीने वर्ष 2019 च्या निवडणुकांसाठीची एक प्राथमिक भूमिका अधिवेशनात निश्चित करण्यात आली. त्याअंतर्गत देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदूंचे मागणीपत्र सिद्ध करण्यात येणार आहे. ‘जो हिंदू राष्ट्र का काम करेगा, वही देश पे राज करेगा’, असा नारा यावेळी देण्यात आली.
आध्यात्मिक हिंदुत्व
हिंदुत्वाचे कार्य केवळ मानसिक, बौद्धिक पातळीवर नाही, तर आध्यात्मिक पातळीवर करणे अपेक्षित आहे. क्षात्रतेजाला ब्राह्मतेजाची जोड देणे हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. त्या धर्तीवर हिंदुत्वाचे कार्य साधना म्हणून कसे करावे, याविषयी एक दिवसीय शिबिरही घेण्यात आले तसेच चार दिवसीय हिंदू राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशनही पार पडले. अधिवेशनाची फलनिष्पत्ती म्हणून हिंदू राष्ट्राच्या मशालीतून देश-विदेशात अनेक ज्योती प्रज्वलित होत आहेत. त्यातूनच हिंदू राष्ट्र स्थापनेचा मार्ग प्रकाशित होत असून, वर्ष 2023 मध्ये भारतात तसेच पुढे संपूर्ण विश्वभरात हिंदू राष्ट्राची स्थापना होईल.
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387