मुंबई | गोपाळकाला आणि गणेशोत्सव ह्या हिंदूंच्या सणांवर ध्वनीप्रदूषणांसंदर्भाताल कायदेशीर मर्यादा घातल्या गेल्या आहेत. शासनाने त्या दूर कराव्यात, अशी मागणी शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
माहितीच्या मुद्याद्वारे गोविंदासंदर्भात सभागृहात विषय उपस्थित करताना सरनाईक म्हणाले, की १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीसाठी रचल्या जाणा-या मानवी थरांवर पाठवण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. गोपाळकाला सण तोंडावर आहे. मात्र, त्याबाबत अद्याप शासनाने धोरण स्पष्ट केले नाही. गोविंदा मंडळांमध्ये त्यामुळे संदिग्धता आहे. गोविंदाबाबत आपले धोरण लवकर स्पष्ट् करावे, अशी मागणी सरनाईक यांनी लावून धरली.
शिवसेना सदस्य सुनील प्रभू यांनीही त्याला समर्थन दिले. योग्य उपाययोजना कराव्यात, त्यामुळे सर्वांना आनंदात आणि उत्साहात सण साजरे करता येतील, अशी मागणीही प्रभू यांनी केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शासनाने निवेदन करावे, असे निर्देश दिले.