दिल्ली : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत महाजन यांनी अधिवेशनात सर्वपक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावाखाली हिंसा योग्य नसल्याचे सांगून कायदा हातात घेणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात गोरक्षकांकडून सुरू असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांवरून विरोधक कोंडीत पकडणार हे माहित असल्याने मोदी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पंतप्रधानांनी या बैठकीत जीएसटीबाबतही सविस्तर माहिती दिली. तसेच आवाहन केले की, पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षांनी सहाकार्य करावे. या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली, संसदीयकार्य मंत्री अनंत कुमार, मुख्तार अब्बास नकवी, एस. एस. अहलूवालिया, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, अकाली दलाचे गुजराल, बीजेडीचे भृतहरी महताब, सीपीएम नेते सीताराम येचुरी, चिराग पासवान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सपाचे मुलायम सिंह, नरेश अग्रवाल, के. डी. राजा उपस्थित होते.
चीनच्या मुद्द्यावर चर्चा करा बैठकीनंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत आम्ही काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सभागृहातील चर्चेत पाकिस्तानसह चीनच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी. तसेच काश्मीरच्या बिघडलेल्या स्थितीबाबात सरकारने चर्चेचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. याबाबत आम्ही सरकारला सहकार्य करणार नाही. गोरक्षेच्या नावाखाली लोकांना ठार मारले जात आहे. गुजरातसह देशभरात टेक्सटाईल कामगारांचे जीएसटीमुळे हाल सुरू आहेत. देशातील पुरस्थिती आणि दार्जिलिंगचा मुद्दा यासर्वावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.