जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग येथे बुधवारी सकाळी चकमकीत सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षादलाचे हे मोठे यश असल्याचे मानले जाते. हिज्बुलचा कमांडर अल्ताफ अहमद दार उर्फ अल्ताफ कचरू व उमर राशीद असे ठार झालेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. अल्ताफ कचरू हा बुरहान वानीचा अत्यंत निकटचा सहकारी होता. हिज्बुल मुजाहिदीनचा हा दहशतवादी कुलगाम जिल्ह्याचा कमांडर म्हणून कार्यरत होता. अनेक वर्षांपासून सुरक्षादल त्याच्या मागावर होते. कचरूवर १५ लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, अनंतनाग येथील मुनवार्ड परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. खूप वेळ चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. दोघांकडे मोठ्याप्रमाणात हत्यारे आढळून आले होते. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली होती. कारवाईदरम्यान अनंतनाग जिल्ह्यातील मोबाइल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.कचरू कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावचा रहिवासी होता. त्याच्यावर १५ लाख रूपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. कचरूचा मृत्यू हे दहशतवादविरोधी अभियानाचे मोठे यश असल्याचे मानले जाते.