श्रीनगर | बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये पोलिसांसह भारतीय लष्कर व हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन वरिष्ठ दहशतवाद्यांत उडालेल्या जोरदार चकमकीत या दोन्हीही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. या कारवाईत बारामुल्लाचे पोलिस अधीक्षक शाफकत हुसैन आणि पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद मुर्तुजा हे गंभीर जखमी झाले आहेत. सोपोरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरगड येथे ही चकमक झडली. अझरुद्दीन उर्फ गाझी उमर आणि सजाद अहमद उर्फ बाबर अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीनचे टॉपचे दहशतवादी होते.
दोन्हीही दहशतवादी स्थानिक
सोपोरपासून 50 किलोमीटर अंतरावर हे दोन्हीही दहशतवादी खासगी वाहनाने जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार लष्कर व पोलिसांनी त्यांना घेरण्याची तयारी केली. त्यांना अमरागड येथे गाठण्यात आले असताना दोन्ही दहशतवाद्यांनी लष्करी जवान व पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या कारवाईत बारामुल्लाचे पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले तर सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल्स, एक पिस्तूल, चार हातबॉम्ब, आणि इतर शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. हे दोन्हीही दहशतवादी सोपोर भागात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहितीही लष्करी प्रवक्त्याने दिली. गाझी उमर आणि बाबर हे दोघेही स्थानिक दहशतवादी असून, काही काळापूर्वीच ते सक्रिय झाले होते.