श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे गुरेज भागात लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले. हिमस्खलन झाल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जवानांच्या बचावासाठी लष्कराने शोध अभियान सुरु केले आहे. जानेवारी महिन्यांत गुरेज भागातच 10 जवान आणि 4 नागरिक बर्फाच्या वादळात मृत्युमुखी पडले होते.
जम्मू-श्रीनगर राजमार्ग बंद
मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने मंगळवारी जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रोडही बंद केला होता. बनिहाल सेक्टरमध्ये बर्फवृष्टी आणि अन्य भागात मोठ्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राजमार्ग बंद करावा लागला. खराब हवामानामुळे येथील त्रिकुला टेकड्या, तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसर्या दिवशी स्थगित करावी लागली आहे. राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. या परिसरात कडाक्याची थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
थंडीच्या लाटेची शक्यता
उत्तर भारतात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने दिल्लीतही त्याचा परिणाम जाणवत आहे. शहरातील अनेक भागात दाट धुके होते. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. रेल्वे गाड्याही उशीराने धावत होत्या. येथील शीतलहरींमुळे उर्वरित भारतात दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.