शिमला : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात भूस्खलनात हिमाचल रोडवेजच्या दोन बस अडकल्या. दोन्ही बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. घटनास्थळावरून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
ढगफुटी आणि भूस्खलन
एक बस चंबाहून मनालीला जात होती, तर दुसरी मनालीहून जम्मूमार्गे कटराला जात होती. भूस्खलनावेळी दोन्ही बस जोगिंदरनगरजवळ कोटरूपी येथे थांबल्या होत्या. त्याचवेळी ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने डोंगरावरून एक मोठी दरड एका बसवर पडली. ही बस 200 मीटर खाली दरीत कोसळली. या बसमध्ये 7 ते 8 जण होते. दुसरी बस पाण्यात वाहून सुमारे 2 किमी दूरवर गेली. ही बस यात्रेकरूंनी भरली होती.
50 जण मृत्युमुखी पडल्याची शक्यता
दुर्घटनेत 50 लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून शनिवारी रात्री 2 वाजेपासून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मंडी जिल्हा प्रशासनाला रात्री 12.35 वाजता या घटनेची माहिती मिळाली, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे वाहतूकमंत्री जी.एस. बाली यांनी दिली.