हिमालयीन पाहुण्या पक्ष्यांचे मेहरुण तलावावर विहार

0

जागतिक स्थलांतरित पक्षीदिनी पक्षीनिरीक्षण उपक्रमात 36 पक्षांची नोंद

जळगाव– जागतिक स्थलांतरित पक्षीदिनानिमित्त जळगाव येथील मेहरूण तलावावर निसर्गमित्रतर्फे पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. सकाळी दीड तासात मेहरूण तलावावर पक्षीनिरीक्षण करण्यात आले असून स्थानिक व स्थलांतरित मिळून एकूण 36 जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.पक्षीनिरीक्षणात हिमालयातून येणारे पांढरा धोबी,करडा धोबी,निळ्या शेपटीचा वेडा राघू आणि देशी तुतारी या स्थलांतरित पाणथळ पक्षांची नोंद घेतल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.पक्षी निरीक्षणात पक्षीनिरीक्षक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांच्या सोबत डॉ.योगेश टेणी,गोकुळ इंगळे,सागर इंगळे,हरीष सोनवणे,अनिकेत खरे,राजेश गोपाळ,महेंद्र चौहाण,नीरज पवार,चरण राठोड सहभागी झाले होते.

पाणथळ पक्ष्यांच्या अधिवसाला अनुकूल वातवरण
स्थलांतरीत पक्ष्यांसोबत जंगल सातभाई ,माळमुनिया,हळद्या, जांभळा सूर्यपक्षी,शिक्रा,भारतीय दयाळ इत्यादी वृक्ष निवासी पक्षी आढळून आले.लवकरच नकटया,चक्रवाक, गडवाल,चक्रांग,नदी सुरय,रंगीत करकोचा,कांडेसर,मोरशराटी,भारतीय पाणकावळा,मोठा पाणकावळा,अशा पाणथळ जातीच्या पक्ष्यांचे तसेच बहिरी ससाणा,कैकर,युरेशिय दलदल हरीण या शिकारी पक्ष्यांचे लवकरच आगमन होण्याची शक्यता आहे.तलाव काठोकाठ भरला असल्याने व तो टाकीसारखा खोल खोदल्याने काठावर दलदलीच अभाव आहे. त्यामुळे पाणथळ पक्ष्यांना येथे येण्यास वेळ लागेल.तसेच जळगाव जिल्ह्यात व एकूणच महाराष्ट्रात सर्वत्र उत्तम पाऊस झाल्याने नद्या,तलाव,धरणे,विविध पाणवठे तुडुंब भरली असल्याने पाणथळ पक्ष्यांच्या अधिवसाला अनुकूल वातवरण झाले असून त्यांना मुबलक अन्न मिळणार असल्याचे आशादायक वातावरण असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले. पक्षी निरीक्षणात पक्षीनिरीक्षक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ , डॉ.योगेश टेणी,गोकुळ इंगळे,सागर इंगळे,हरीष सोनावणे,अनिकेत खरे,राजेश गोपाळ,महेंद्र चौहाण,नीरज पवार,चरण राठोड हे विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.