पुणे । पुणे महापालिकेचे दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे प्रभाग क्रमांक 21 (अ) मध्ये 11 ऑक्टोबर रोजी होणार्या पोटनिवडणुकीसाठी भाजप-रिपब्लिकन आघाडीच्या वतीने हिमाली कांबळे यांनी शुक्रवारी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे, आमदार योगेश टिळेकर, शहराध्यक्ष योगेश गोगावले, रिपाई शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, नगरसेविका लता धायरकर, नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, नगरसेविका सुनीता वाडेकर, असित गांगुर्डे आदी उपस्थित होते. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप आणि रिपाईच्या हालचाली सुरू असून मनसेने या ठिकाणी उमेदवार देणार नसल्याचे या पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आता आघाडीकडून काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.