हैदराबाद । एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या तेलंगणा दौर्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा यांनी आपल्या दौर्यादरम्यान 2019 साली तेलंगणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शहा यांना हैदराबादमधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. तसेच सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला अस्मान दाखवण्याची काळजी आमचा पक्ष घेईल, असेही विधान त्यांनी यावेळी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी माझे शब्द लक्षात ठेवावेत. हैदराबादची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. गोशामहल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. तर अंबरपेट, मुर्शिदाबाद, खैरताबाद आणि उप्पलमध्येही भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागेल. एकुणच तेलंगणात भाजपचा मोठा पराभव होईल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. याशिवाय, 2019 मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय होईल, या अमित शहांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली. हैदराबादमध्ये विजय मिळवणे भाजपला एवढे सोपे वाटते का? आम्ही याठिकाणी अनेक वर्ष काम केले आहे. भाजपला याठिकाणी निवडणूक लढवायची असेल तर खुशाल लढवू दे. या मतदारसंघात माझ्याविरुद्ध अन्य कोणता उमेदवार देण्यापेक्षा अमित शहा यांनीच लढावे, असे जाहीर आव्हान ओवेसी यांनी दिले. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मिशन दक्षिणची ब्ल्यू प्रिंट सोपवली होती. या माध्यमातून भाजपची दक्षिणेतील आंध्र पद्रेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.