भुसावळ। शहराचे कमाल तापमान आणि दुसरीकडे वृक्षतोडीचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. यामुळे पालिकेने ’ग्रीनस्पेस डेव्हलमेंट’साठी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात जून ते जुलैदरम्यान 3 हजार, तर पुढे सलग 4 वर्षे प्रत्येकी 3 हजार अशी पाच वर्षांत 15 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. यामुळे शहराला ‘ग्रीनसिटी’चा लूक मिळले.
रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणार स्थानिक प्रजातींची झाडे
अमृत योजनेच्या ग्रीनस्पेस डेव्हलमेंट (हरितपट्टा विकास) आराखड्यानुसार पालिकेने वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. कोणत्याही हे नियोजन कृतीत उतरवण्यासाठी पंचवार्षिक आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा पावसाळ्यात 3 हजार झाडांची लागवड होईल. शहरातील पालिका मालकीचे ओपन स्पेस, प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा जागा, विज तारांना स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड केली जाईल.
वृक्ष संगोपनावर भर
दीपनगर औष्णिक केंद्रामुळे शहराचे तापमान झपाट्याने वाढते आहे. तापमान वाढीचा हा आलेख पाहता केवळ वृक्षलागवड हाच त्यावरील पर्याय आहे. यासाठीच पालिकेने हरितपट्टे विकसीत करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यात केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर वृक्षसंगोपनावर भर देण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली.