डॉक्टरविरुद्ध गुन्हा : जिल्हा चिकित्सकांच्या अहवालात ठपका
चाळीसगाव- चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे हिरापूर येथील 12 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी हिरापूर गावातील डॉ.रंजन देसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन आणि जिल्हा चिकित्सकांच्या अहवालानुसार डॉ.देसले यांच्यावर बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवण्यात आले. धनराज अशोक मोरे असे मृत बालकाचे नाव आहे. धनराज याच्या अंगात ताप आणि त्याला जुलाब-वांत्या होत असल्याने 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी गावातीलच बीएएमएस डॉ. देसले यांच्या कृष्णा क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी अधिक खालावली. त्यानंतर रविवार, 30 रोजी सकाळी 10 वाजता त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार व जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार डॉ. रंजन देसले यास बालकाच्या मृत्यूप्रकरणी दोषी धरण्यात आले. या अहवालानुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या तक्रारीवरुन डॉ. देसले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. हवालदार हिरामण तायडे तपास करीत आहेत.