धुळे। शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग-4 कर्मचार्यांच्या पदोन्नत्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य लघूवेतन कर्मचारी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला होता. या पाठपुराव्यामुळे अखेर 13 कर्मचार्यांना लिपिकपदावर बढती मिळाली असून संघटनेच्या मागणीला यश मिळाले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य लघूवेतन कर्मचारी संघटनेतर्फे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व संचालक डॉ. शिनगारे व अधिष्ठाता डॉ.सतीशकुमार गुप्ता यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते.
अधिष्ठाता डॉ.गुप्ता यांचा केला सत्कार
अखेर संघटनेच्या या मागणीला यश मिळाले असून नुकतेच 13 कर्मचार्यांना लिपिकपदावर बढती मिळाली आहे. पदोन्नतीप्रकरणी अधिष्ठाता डॉ. सतीशकुमार गुप्ता व सहकार्यांच्या मदतीने कर्मचार्यांना पदोन्नती मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने लघूवेतन कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. गुप्ता यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश चौधरी, रामदास दुसाने, विनोद सोनार, बाळू घोटाळे, नारायण चौधरी, गोकूळ पाटील, कांताबाई वर्पे, सुनिता गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील वर्ग-4 कर्मचार्यांनी अडीअडणींबाबत संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याध्यक्ष गिरीश चौधरी यांनी केले आहे.