जळगाव । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा दिगर येथील पोळा सणानिमित्त वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावातील पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले. हिवरखेडा दिगर येथील संजय नामदेव पवार यांचा मुलगा प्रदीप हा वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने वाघूर नदीला पूर आलेला आहे.
प्रदीप हा बैलांना धूत असतांना अचानक नदीत असलेल्या खोल डोहात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता कळताच गांवावर शोककळा पसरली आहे. प्रदीप हा जामनेर येथील धाडीवाल महाविद्यालयातील 11 वी कॉमर्सचा विद्यार्थी होता. पोळा सणाच्या दिवशीच नदी भरून वाहू लागल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे आपले बैल व इतर गुरे ढोरे धुण्यासाठी त्यांची पावले आपोआप नदीकडे वळली होती.