हिवाळी अधिवेशनात बेस्टच्या तोट्याचा विषय लावून धरणार

0

मुंबई । सध्या बेस्ट आर्थिक समस्यांनी ग्रासलेली असून, आम्ही बेस्टच्या अडचणीबद्दल येत्या अधिवेशनात प्रश्‍न मांडणार आहोत. बेस्ट महापालिकेचे अंग आहे. त्यासाठी आम्ही आमच्या परीने योग्य ते प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सरकारलाही या हस्तक्षेप करण्यास भाग पाडू, असे आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. बेस्ट वसाहतीमधील व्यायामशाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोरेगाव (प.) ओशिवरा बेस्ट कर्मचारी व अधिकारी वसाहतीत शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर आदी उपस्थित होते. या वेळी बेस्ट मुंबई श्री 2017 व बेस्ट गोरेगाव श्री 2017 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जनतेच्या मनात स्थान करावे
बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ म्हणाले की, आता नगरसेवक नसतानाही प्रमिला शिंदे सातत्याने विभागात कार्यक्रम राबवतात. निवडणुकीत हार-जीत हा आकड्यांचा खेळ आहे; पण लोकांच्या मनात जागा निर्माण करणे हे फक्त शिवसेनेच्या नगरसेवकांनाच जमते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बेस्टला आर्थिक कोंडीतून आम्ही बाहेर काढणार असून, नागरिकांनी बेस्टने प्रवास करावा. बेस्टला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दिलीप शिंदे, माजी नगरसेविका प्रमिला शिंदे, गोरेगाव महिला विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर, उपविभागप्रमुख दीपक सुर्वे, शाखाप्रमुख लक्ष्मण नेहरकर, ओशिवरा बेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय भालेराव, सचिव प्रदीप सावंत, खजिनदार तुकाराम बाबर, दादासाहेब पवार, मोहन भासल, कांबळे, सिनेअभिनेता व व्यायामपटू केतन करंडे तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.