मुंबई । राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेंबरपासून सुरु होत असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली. गुजरात निवडणुका लागल्या तरी अधिवेशन ठरलेल्या कालावधीतच होणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने तारखांचा संभ्रम संपला आहे. दरम्यान, विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
अधिवेशनात मांडणार 13 विधेयक, अकरा अध्यादेश
कामकाज सल्लागार समितीने सध्या 11 ते 22 डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित केले आहे. याकाळात नवीन 13 विधेयके आणि अकरा अध्यादेश विधीमंडळात मांडले जातील. 20 तारखेला सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे.
अधिवेशनाचा कालावधी वाढवा – धनंजय मुंडे
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केवळ दहा दिवस कामकाज होणार आहे. विदर्भासारख्या मागास भागात होणारे अधिवेशन किमान चार आठवडे चालले पाहिजे. ही प्रादेशिक असमतोलता आहे असे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी सांगितले.