हिवाळी अधिवेशन केवळ दहा दिवसांचे!

0

मुंबई : राज्याची उपराजधानी नागपुरातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघे दहा दिवस चालणार आहे. 11 डिसेंबररोजी अधिवेशनास सुरुवात होणार असून, 22 डिसेंबररोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. केवळ दीड आठवड्याच्या कामकाजावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे अधिवेशन किमान चार आठवडे चालवावे, असेही मुंडे म्हणाले.

गोंधळाऐवजी सहकार्य करा!
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाची रुपरेखा तयार करण्यात आलेली आहे. अधिवेशनासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून, सरकारकडून विरोधी पक्षाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी कामकाज चालू द्यावे, अशी विनंती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. या अधिवेशनात पुरक मागण्यांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, 21 डिसेंबरला अंतिम सप्ताह प्रस्तावावर चर्चा घेतली जाणार आहे. तसेच, शिर्डी येथील विमानतळाच्या नामविस्ताराबाबत प्रस्तावदेखील पारित केला जाणार आहे, असे बापट म्हणाले. अधिवेशनादरम्यान 20 डिसेंबरला संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाणार असून, काही कामकाज अनिर्णित राहिले तर अधिवेशनाचा कालावधी वाढविला जाईल, असेही बापट यांनी सांगितले.

दहा दिवसांचा कालावधी अपुरा!
विदर्भासारख्या मागासलेल्या भागाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवायला हवा. किमान चार आठवडे तरी सभागृहाचे कामकाज चालले पाहिजेत. प्रादेशिक असंतुलनाबाबत केळकर समितीच्या अहवालावर डिसेंबर 2014 मध्ये चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या कार्यवाही समितीच्या अहवालावरही या अधिवेशनात चर्चा घडून यायला हवी. राज्याच्या मागासलेल्या भागाच्या विकासासाठी अधिवेशनात चर्चा घडणे आवश्यक आहे. तेव्हा केवळ दहा दिवसाचा कालावधी अपुरा असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.