मुंबई: महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र हे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रुचले नाहीये. त्यांनी शिवसेनेचे पाचही नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोनवरून अजित दादांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांमुळे आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षपदावरून नगरसेवक आणि विजय औटी यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याचे बोलले जात आहे.