‘ही तर जवानांची थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या’

0

रायपूर । छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेला हल्ला म्हणजे ‘सीआरपीएफ जवानांची थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या’ असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ‘नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर केलेला हल्ला हा भ्याड स्वरुपाचा असून जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही,’ असे राजनाथ सिंह यांनी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले.

‘केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात येईल,’ असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह उपस्थित होते. डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावाद्यांबद्दलची केंद्र सरकारची रणनिती संपूर्णपणे बदलण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली. ‘आम्ही संपूर्ण व्यूहनितीचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल करु. आवश्यकता असल्यास नक्षलग्रस्त भागांना भेट देऊन व्यूहनिती आखली जाईल. मात्र डाव्या कट्टरतावादींची पाळेमुळे समूळ नष्ट करण्यात येतील,’ असे राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्याची रणनिती ठरवण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक 8 मे रोजी बोलावण्यात आली आहे.

हल्ल्याचा सुत्रधार 25 वर्षाचामडवी हिडमा
सुकमामधील नक्षली हल्ल्यामागे नक्षली कमांडर मडवी हिडमा याचा हात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी आत्तापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांवरुन संशयाची सूई हिडमाकडे वळली आहे. हिडमा हा फक्त 25 वर्षांचा आहे. या हल्ल्याचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणातील अधिकार्‍यांनी नक्षली कमांडर मडवी हिडमा उर्फा हिडमन्ना हा या हल्ल्याचा सूत्रधार असावा असा संशय व्यक्त केला आहे. हिडमा हा स्थानिकांमध्ये संतोष आणि हिडमालू या नावाने सुद्धा कुप्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून हिडमाने या भागात स्वतःची दहशत निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या भागातील मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचाही समावेश आहे. हिडमावर पोलिसांनी 25 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

रमणसिंह नक्षलवाद्यांसी तडजोड करतातः दिग्विजय सिंह
नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असून नक्षलवाद्यांबरोबर तडजोड करुन भाजपाने तेथे विजय मिळवला आहे असे विधान दिग्विजय यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. दिग्विजय सिंह यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. सुकमामधील नक्षलप्रभावित भागामध्ये राहणा-या आदिवासी नागरीकांना विश्वासात घ्या. त्यांचा विश्वास संपादन केला तरच, तिथे प्रशासन चालवता येईल असे दिग्विजय म्हणाले.