ही दोस्ती तुटली ना भाऊ!

0

एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं आणि शेतकरी आंदोलनातून शासनात आलेलं नाव म्हणजे सदाभाऊ खोत. शेतकर्‍यांसाठी कित्येकदा रास्ता रोको आणि तत्सम प्रकारची आंदोलने करून कित्येक वेळा जेलमध्ये जाऊन आलेले सदाभाऊ शासनात आज मंत्री आहेत. अर्थातच सदाभाऊ मंत्री झाले ते अर्थातच खा. राजू शेट्टी यांच्यामुळे. अर्थात केवळ उपकार म्हणून राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना मंत्रिपद दिलेले नाही. यासाठी सदाभाऊ यांनी स्वभिमानीसाठी केलेली अफाट मेहनत देखील महत्वाची आहेच. सदाभाऊंच्या सरकारी बंगल्यात गेल्यावर भिंतीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचे सध्याचे तारणहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांच्यामुळे आंदोलनात आले ते स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांच्या मोठ-मोठ्या तसबिरी लावलेल्या दिसतात.

अर्थात सगळ्याच मंत्र्यांच्या दालनात अशा ’आदर्श’ असणार्‍या मार्गदर्शकांच्या प्रतिमा लावलेल्या असतात. मात्र सदाभाऊंच्या बंगल्यात अजून एक तसबीर आहे जी प्रत्येकाचे ध्यानाकर्षण करते. चळवळीतून राजकारणाच्या प्रवाहात आलेल्या तीन मित्रांची ही प्रतिमा आहे. खा. राजू शेट्टी, ना. महादेव जानकर आणि सदाभाऊ यांची हात गळ्यात टाकून अतिशय सुरेख हसतानाचा हा फोटो पाहून ही दोस्ती किती जबरी होती याचा प्रत्यय पाहणार्‍यांना येतो. त्या फोटोवर लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे या तीन हिरोच्या गाजलेल्या धडाकेबाज चित्रपटातील ’ही दोस्ती तुटायची नाय’ असं देखील लिहिलेलं आहे. या तिघांच्या चळवळीतील धडाकेबाज कारकिर्दीची आठवनच हा फोटो करून देतो.

शेतकरी आंदोलनातून उभरलेले नेतृत्व ते मंत्रिपद असा स्वप्नवत प्रवास केलेले कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वाभिमानी आणि खा. राजू शेट्टी यांना सोडचिठ्ठी देण्याच्या किंवा स्वाभिमानीतून त्यांची हकालपट्टी होण्याच्या टप्प्यावर आहेत. इतक्या दिवसाचा दोस्ताना त्यांनंतर आलेली कटुता आता तुटण्याच्या अंतिम पटलावर आहे. एव्हाना कुठल्याही क्षणी याची घोषणा होईल. खासकरून शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनापासून एकमेकांवर कुरघोडी करत निभावलेली बळजबरीचा दोस्तीचा धागा आता कधीही तुटेल.

शेतकर्‍यांसाठी आंदोलन पेटले असताना राजू शेट्टी सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवीत असताना सदाभाऊ मात्र मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळून घेत सत्तेत राहण्याचा आपला सेफ झोन मजबूत करण्यात व्यस्त आहेत. सध्या सोशल मीडियात खा. राजू शेट्टी आणि ना. सदाभाऊ खोत यांच्यातील लेटर वॉर जोरदार सुरू आहे. दोघेही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींवर उतरल्याचे चित्र यादरम्यान दिसून आले. सदाभाऊ यांच्या वडिलांच्या आजारपणाचा खर्च केल्याचे स्क्रिनशॉट खा. शेट्टी यांच्या नावाने फेसबुक, व्हाट्स अप वरून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर सदाभाऊ यांच्या नावाने ती रक्कम वापस केल्याची मोठी पोस्ट व बँकेचे ट्रांजेक्शन डिटेल्स सोशल मीडियात व्हायरल झाल्या. सोशल मीडियात अशा प्रकारच्या पोस्ट फिरू लागल्यानंतर आणि एकूणच दोघांमधील वादाचे चित्र पाहिल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. नेमकं कोण चुकतंय? आणि कुणाची बाजू घ्यावी? हा प्रश्न स्वाभिमानीच्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सतावत आहेत. काही कार्यकर्ते सदाभाऊंना पैसे परत केले मग आमदारकी परत करणार का? मंत्रिपद परत करणार का? पैशांची गोष्ट सोडा प्रेम, आपुलकी, विश्वास परत करणार का? असाही सवाल कार्यकर्ते करत आहेत.

असो, आता कुठल्याही क्षणी या धडाकेबाज दोस्तीचा दी एंड राजकीय स्तरावर होतोय. यामुळे निश्चितच फरक पडणार आहे. राजकारण म्हणजे सत्ता चळवळ किंवा मैत्रीवर कशा पद्धतीने वरचढ होते याचे हे उदाहरण लक्षात ठेवण्याजोगे राहील. बाकी सदाभाऊंचे देखील संघटनेसाठी केलेलं योगदान विसरण्याजोगे नाहीच. मात्र मोक्याच्या क्षणी सत्तेच्या सोयीची भूमिका खा. शेट्टी आणि कार्यकर्त्यांना दुखावणारी ठरलीय, हे मात्र नक्की. सदाभाऊंना ’त्या’ फोटोबद्दल एकदा विचारले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते, मी शेवटपर्यंत ही दोस्ती न तुटावी यासाठी प्रयत्न करणारय. दोस्ती जोडायला नेमकं कोण कमी पडले? हे येणार काळ आणि कार्यकर्ते ठरवतीलच.

-निलेश झालटे
9822721292