ही वाट ’खड्ड्यात’ जाते!

0

पुणे : यंदा पावसाला उशीरा सुरूवात झाली असली तरी शहरातील रस्त्यांची दुर्दशा मात्र बदलण्याचे नाव घेत नाही. गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसाने पुण्यातील डांबरी रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे दिसू लागले. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना महापालिकेने प्राधान्य दिल्याने डांबरी रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तात्पुरते, घाईघाईने केलेले रस्ते उखडले गेले आणि रस्ता समतोल नसल्याने वाहनचालकांची वाहन चालविताना त्रेधातिरपीट उडू लागली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणार्‍या लहान रस्त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे.

तात्पुरती मलमपट्टी ठरतेय डोकेदुखी
गेल्या दोन वर्षांत जलवाहिनी, ड्रेनेज, तसेच केबल व अन्य कामांसाठी खणलेल्या रस्त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण झाले. मात्र पावसाचा मारा ते सहन करू शकले नाहीत. खणलेल्या रस्त्याच्या ठिकाणी डांबरीकरण करताना जी काळजी घेण्याची आवश्यकता असते, ती न घेतल्याने त्या भागात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला आहे. त्यात पाणी साठल्याने, भर पावसात वाहन चालविताना खड्ड्याचा अंदाज येत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

महावितरणची खोदाई त्रासदायक
त्यातच यंदा प्रथमच पावसाळ्यातही रस्त्यांची खोदाई करण्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील एकूण 400 किलोमीटरच्या रस्त्यांची चाळण होणार असून हे रस्ते पूर्ववत करण्याचे कामही वीज वितरण कंपनी करणार आहे. मात्र ते नक्की कोणता रस्ता खोदत आहेत, याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे
काही मोठ्या रस्त्यांवर मध्यभागी काँक्रिटीकरण केले असून, त्यालगतच्या भागात डांबरीकरण केले आहे, तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविलेले आहेत. अशा ठिकाणी दोन्ही रस्त्यांचा भाग समतोल नसल्याने, किंवा मध्ये मोठी भेग निर्माण झाल्याने वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील नव्याने डांबरीकरण केलेला भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे रस्त्यावर बारीक खडी पसरल्याने वाहने घसरू लागल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत. मागील वर्षी निवडणुका असल्याने चमकोगिरी करणार्‍या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अत्यंत वाईट दर्जाचे रस्ते केले होते. आता पाऊस आल्यावर हे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून रुंदीच्या दोन टक्के उतार केला जातो. परंतु, अशा कोणत्याही बाबी ध्यानात न घेता रस्ते केल्याने यंदा पुणेकरांची गैरसोय अटळ आहे.