ही विकृती नष्ट व्हायला हवीय..!

0

लोकांची विकृती अगदी तळाच्याही खालच्या टोकाला जात असलेल्या समाजात आपण राहतोय, याची खरोखर किळस येतेय. आपण या अशा समाजात का बरे जन्मलो, असा सवाल काही घटना घडल्यानंतर नेहमीच कुठल्याही संवेदनशील असलेल्या माणसाला पडत असेल. जामनेर तालुक्यात वाकडी (जि. जळगाव) गावात घडलेली घटना निश्‍चितपणे महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. खरेतर आता महाराष्ट्राला पुरोगामी असे म्हणणे हा पुरोगामी शब्दाचादेखील अपमान वाटायला लागलाय. ज्या फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेऊन महाराष्ट्राच्या पुरोगामी असण्याचा बाता आपण मारतो तिथे आता या महापुरुषांची नावे घेताना अशा घटनांमुळे अपराधी वाटायला लागलंय. बाबासाहेबांनी अछूत समजल्या जाणार्‍या समाजासाठी त्यावेळी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आज हाच अछूत समजला जाणारा समाज शिक्षित होतोय. वर येतोय. मात्र, आता वेगळ्या प्रकारच्या बहिष्काराचा सामना या घटकांना करावा लागतोय. अर्थात शिकलेली लोकं या गोष्टींना फाट्यावर मारून आपले हक्क मिळवून घेतात. मात्र, गावखेड्यात राहणार्‍या आणि मोठी संख्या असलेल्या लोकांचं काय? हा प्रश्‍न आहेच, तर परवा आमच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून मातंग समाजाच्या दोन मुलांना नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांची धिंड काढली असल्याचीही माहिती समोर आली. या मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. गावातल्या ईश्‍वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीत ही मुले पोहण्यासाठी उतरली होती. त्यावरून ईश्‍वर बळवंत जोशी आणि प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ पाहून त्यातली अमानुषता दिसून येते. आधी सोशल मीडियावर आणि नंतर टीव्हीवर हा व्हिडिओ झळकला.

अशा घटना सोशल मीडियात आल्यानंतर पहिल्यांदा पीडिताची जात आणि नंतर आरोपीची जात बघितली जाते. आपल्या उद्देशानुसार जर या दोन्ही घटकांच्या जाती निघाल्या नाहीत, तर मग या नेटकरी लोकांचा मूड डाऊन होतो. मग एकतर चर्चा थांबते किंवा चर्चेला वेगवेगळे अँगल दिले जातात. आपला उद्देश सफल झाला नाही की मीडियादेखील विषय सोडून देते आणि सगळे सारवासारव करायला आलेले लोकं हळूहळू गायब होऊन जातात. मातंग समाजाची मुलं विहिरीत पोहली म्हणून विहीरमालक आणि त्याच्याकडे असलेल्या सालगड्याने त्यांना मारहाण केली. जे घडले ते सगळेच अमानुष आहे. मुले विहिरीत पोहत होती. त्यांचे कपडे विहीरमालकाने ताब्यात घेतले आणि त्यांना तसेच ते शेतातल्या घरात घेऊन आले आणि तिथे पुढचा सगळा मारहाणीचा आणि शूटिंगचा प्रकार घडला. मारले ते ठीक आहे, पण आमची शूटिंग करू नका असे म्हणत असतानादेखील आमची शूटिंग काढली, असे या घटनेतील एक पीडित पोरगा सांगत होता. या घटनाक्रमात नग्न धिंड बाजूला ठेवली तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. लहान मुलांना नग्न करणे, त्यांना क्रूरपणे मारहाण करणे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे, हे सगळेच गंभीरच आहे.

या घटनेत किंवा जातीधर्माशी जुळलेल्या अशा अनेक घटनांमध्ये माध्यमांची भूमिका ही फारच मजेशीर गोष्ट असते. जामनेरची घटना जशी बाहेर आली तशी आरोपीच्या ’जोशी’ नावावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले. मात्र, जसं हे जोशी म्हणजे ब्राह्मण नव्हे, तर ’कुडमुडे भटके जोशी’ आहेत अशी माहिती आली तशी अनेकांची निराशा झाली, तर अनेकांना हायस वाटलं. लगेच गेस्ट बोलावून चर्चेचा महापूर येऊ लागला, अशा घटना घडल्या की हल्ली वेगवेगळी स्थित्यंतरे घडतात आणि काही काळानंतर ही प्रकरणे कुठल्या कुठे चालली जातात. शिर्डीत ’लय मजबूत भीमाचा किल्ला’ रिंगटोन वाजली म्हणून पोराला जीव मारलेली घटना असो, नितीन आगेची हत्या असो, अशा अनेक घटना होऊन गेल्यात. क्षुल्लक कारणावरून खरेतर एखाद्याचा जीव घेणे आज फार स्वस्त झालेय. मात्र, जाती-धर्मसारख्या विशिष्ट गोष्टीच्या रागातून एखाद्याची हत्या करणे किंवा अमानुष वागणे ही फार मोठी धोक्याची सूचना आहे. यातून तयार होणारा विद्रोह फारच भयानक आहे. समाजात खरेतर अनेक विकृती आपल्या अवतीभवती आहेत आणि या विकृती बाहेर येणे आणि पर्यायाने नष्ट होणे फार गरजेचे आहे. जामनेरची ही घटना खरोखर मानवतेला काळिमा फासणारी आहे.

यात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलेली एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. गावगाड्याची वीण उसवली जाऊ नये, यासाठी अत्याचारित कुटुंबानेच समंजसपणा दाखवावा, अशी अपेक्षा केली जाते. ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्यासंदर्भात कुणीच काही बोलत नाही. जिथे जिथे अशा घटना घडतात तिथे तिथे गाव बहुतांशवेळा अत्याचार करणार्‍यांच्या सोबत असतो. कारण अत्याचार करणारा गावातल्या बहुसंख्याकांचा प्रतिनिधी असतो. तक्रार करणार्‍या गरिबांनी एवढा माज दाखवायला नको होता, अशीच व्यापक भावना असते. गावात राहायचे तर एवढ्या टोकाला जाऊन चालत नाही, असेही म्हटले जाते. अन्यायग्रस्तांना सल्ले द्यायला सगळेच असतात. ज्याने अमानुष कृत्य केलेय त्याला चार शहाणपणाचे शब्द सांगण्यासाठी कुणी पुढे येत नाही. कारण गावाच्यादृष्टीने तोच अन्यायग्रस्त बनलेला असतो आणि मूळचा अन्यायग्रस्त म्हणजे माजोरी. बाहेरच्या पुढार्‍यांनी जाऊन गावातले वातावरण बिघडवू नये, हे खरे आहे. पण आजच्या प्रसारमाध्यमांच्या आणि त्यातही सोशल मीडियाच्या काळात गावातली सामाजिक अन्यायाची बातमी गावापुरती राहणार नाही. ती तालुका, जिल्हा, राज्य, देश एवढेच नव्हे तर जगभर जाते. जगभरातून प्रतिक्रिया येतात, त्या टाळता येणार नाहीत. अर्थात सत्तेच्या मस्तीत असे कृत्य करणार्‍यांना त्याची जाणीव नसते. बोभाटा झाल्यावर कायद्याचा बडगा पडल्यावरच त्यांना गांभीर्य कळते. परंतु, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात 2018 सालीही एक सत्य मागे उरते, ते म्हणजे ज्याच्यावर अत्याचार होतो तो शंभर टक्केवेळा गरीब असतो आणि 99.99 टक्के वेळा दलितच.

चोरमारे सरांच्या या भूमिकेशी 100 टक्के सहमत आहे. समाजात कथित सामाजिक, आर्थिक दृष्टीने बलशाली असलेला घटक कमजोर लोकांचे शोषण करतो, अन्याय करतो. हा इतिहास होता आणि वर्तमानदेखील आहे. हे भविष्य असू नये यासाठी ही विकृती नष्ट होणे आणि माणूस म्हणून राहण्याची अक्कल येणे फार आवश्यक आहे.

याची किळस वाटते आहे
खरेतर आता महाराष्ट्राला पुरोगामी असे म्हणणे हा पुरोगामी शब्दाचादेखील अपमान वाटायला लागलाय. विकृती अगदी तळाच्याही खालच्या टोकाला जात असलेल्या समाजात आपण राहतोय, याची खरोखर किळस येतेय. आपण या अशा समाजात का बरे जन्मलो, असा सवाल काही घटना घडल्यानंतर नेहमीच कुठल्याही संवेदनशील असलेल्या माणसाला पडत असेल. जामनेर तालुक्यात वाकडी (जि. जळगाव) गावात घडलेली घटना निश्‍चितपणे महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. समाजात कथित सामाजिक, आर्थिक दृष्टीने बलशाली असलेला घटक कमजोर लोकांचे शोषण करतो, अन्याय करतो. हा इतिहास होता आणि वर्तमानदेखील आहे. हे भविष्य असू नये यासाठी ही विकृती नष्ट होणे आणि माणूस म्हणून राहण्याची अक्कल येणे फार आवश्यक आहे.

निलेश झालटे
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9822721292